मालदीव राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात घुसखोरी; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:20 AM2022-08-05T07:20:47+5:302022-08-05T07:20:53+5:30
वाहतूक थांबविल्याने पोलिसांना धक्काबुक्की
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली असता, पोलिसांसोबत वाद घालत ताफ्यात दुचाकी घुसविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरुवारी सकाळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह हे मुंबई येथून जेएनपीटीला चालले होते. सकाळी १०च्या सुमारास त्यांचा ताफा पामबीचमार्गे बेलापूरकडे जात असल्याने काही वेळासाठी करावे जंक्शन याठिकाणी पामबीचवर येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्याचवेळी करावे येथे राहणाऱ्या राहुल धुळधुळे याने पामबीच मार्गावर दुचाकी घुसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला व्हीआयपी जात असल्याने थांबण्यास सांगितले असता, त्याने वाद घालून शिवीगाळ करत मार्गात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. अखेर बळाचा वापर करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची ‘जेएनपीए’ला भेट
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद यांनी गुरुवारी जेएनपीए बंदराला भेट दिली. दोन तासांच्या भेटीत त्यांनी बंदराच्या विकास, प्रगती आणि कामकाजाची पाहणी करून भविष्यात दोन देशांतील सागरी व्यापार वृद्धिंगत करण्याची ग्वाही दिली. मोहम्मद सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, तसेच प्रशासनाचे सर्वच विभागांतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.