पनवेल : कळंबोली येथील जेएनपीटीकडे जाणारी मालगाडी सोमवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास रुळावरून घसरल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. सुमारे पाच तासानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र या घटनेमुळे पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. सुमारे दीड तास उशिरा गाड्या धावत होत्या.घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबोली येथून पनवेलजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. रुळामधील बिघाड झाल्याने मालगाडीचे डबे खाली उतरल्याची माहिती पनवेल रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एस.एम. नायर यांनी दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे पाच तास याठिकाणी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आला. तर जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-रोहा पॅसेंजर, मांडवी आदी गाड्या सुमारे दीड तास उशिरा धावत होत्या. या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला तर काहींनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. मालगाडीमध्ये कंटेनर होते. संबंधित घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.>मोठी दुर्घटना टळलीअपघात झालेला रेल्वे मार्ग व्यस्त मार्ग म्हणून ओळखला जातो. सोमवारी मालगाडीचे चार डबे रुळावरून खाली उतरले यात कपलिंगही तुटल्याने ते लगतच्या रेल्वेमार्गावर आले. सुदैवाने दुसºया बाजूने गाडी न आल्याने मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीसाठी पाच तास रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद होती.
पनवेलजवळ मालगाडी घसरली, पाच तास रेल्वे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:04 AM