शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:35 PM2020-09-18T23:35:58+5:302020-09-18T23:36:46+5:30
शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरातील मॉल सहा महिन्यांनी पुन्हा एकदा सुरू होऊनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे लॉकडाऊनपूर्वी नेहमी गजबजलेले मॉल ओस पडल्याचे दिसून येत आहेत. सहा महिन्यांतील तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी मॉलमधील व्यावसायिकांनी किमतीमध्ये सवलती देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने, अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत.
शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. त्यानंतर, शहरातील वाढत्या मॉलमुळे खरेदीदारांमध्ये मॉल संस्कृती तयार झाली होती, तर मॉलमधील इतर मनोरंजनाची साधने, फूड कोर्ट यामुळे सहज फेरफटका मारणाऱ्यांकडून नकळत खरेदी केली जायची. त्यात तरुण-तरुणींचा अधिक समावेश असायचा. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केल्याने मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्सचे शटर नुकतेच उघडले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेत, व्यवसाय करण्यास मॉल व्यवस्थापनांना प्रशासनाने अनुमती दिली आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा सर्व मॉल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मॉलमधील दुकाने आहे, त्या स्थितीत बंद राहिल्याने, त्यामधील मालाचे नुकसान होऊ लागले होते. त्यात कपडे व लेदरचे साहित्य असलेल्या व्यावसायिकांचा समावेश होता. यामुळे पुन्हा एकदा मॉल सुरू झाल्याने, सहा महिन्यांत झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न मॉलमधील व्यावसायिकांकडून सुरू आहे, परंतु नवी मुंबईत अद्यापही कोरोना अपेक्षित असा नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे मॉल सुरू होऊनही त्या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध वस्तूंच्या किमतीवर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. ३० ते ५० टक्क्यांपर्यंतच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही तुरळक ग्राहक खरेदीसाठी येत असल्याची खंत व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. एक ते दीड लाख रुपये भाड्याने अनेक व्यावसायिकांनी मॉलमधील जागा घेतल्या आहेत. त्यामुळे किमान भाडे तरी नफ्यातून सुटावे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
फूड कोर्ट बंदच : मॉलमधील बैठक व्यवस्था हटविण्यात आली आहे, तर फूड कोर्टही बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळेही मॉलकडे वळणारे पाय कमी झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायांवर दिसून येऊ लागला आहे. अशीच परिस्थिती अधिक काही काळ राहिल्यास शहरात उदयास आलेली मॉल संस्कृती मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.