नवी मुंबई : शहरातील मॉल्स पुन्हा बंद करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. मॉल्समध्ये शहराबाहेरील नागरिकही खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबईमधील मॉल्स चार महिन्यांच्या बंदनंतर ५ आॅगस्टला सुरू करण्यात आले. महानगरपालिकेच्या पथकांनी सर्व मॉलमध्ये जाऊन निरीक्षण केले असता पहिल्याच दिवशी नवी मुंबई व इतर शहरांतून नागरिक खरेदीसाठी आले होते. पनवेल व इतर शहरांत मॉल बंद ठेवले आहेत. यामुळे तेथील नागरिकही वस्तू खरेदीसाठी नवी मुंबईमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाल्याने आयुक्त अभिजित बांगर यांनी एका दिवसात पुन्हा मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील मॉल सुरू झाल्यानंतर नवी मुंबईमध्येही त्याविषयी विचार केला जाणार असून तोपर्यंत सर्व मॉल, मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहेत. दरम्यान, एकाच दिवसात मॉल्स बंद करण्याचा आल्याने मॉल्सच्या मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.