कळंबोलीतील मालधक्का हरवला धुळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:39 PM2019-03-05T23:39:44+5:302019-03-05T23:39:51+5:30
कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
पनवेल : कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने मंगळवारी कामगार संघटनेच्या वतीने रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. मात्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रात या गोष्टी येत नसल्याने मुंबई येथील डीआरएम कार्यालयात जाऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे माथाडी नेते राजेंद्र बनकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्ट्री मार्केट परिसरात अनेक समस्या भेडसावत आहे. मंगळवारी भाजपा माथाडी कामगार संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास महानवर यांच्यासह माथाडी कामगारांनी मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता आणि मुख्य माल पर्यवेक्षक बी. प्र. कुजुर यांची भेट घेतली आणि येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.
>ंनिवारा शेड धक्क्यापासून दूर
रेल्वेने माथाडी कामगारांकरिता निवारा शेड बांधून दिले आहे; परंतु धक्का आणि हे अंतर जास्त आहे. स्वच्छतागृहही लांब असल्याने कामगारांची गैरसोय होत असल्याचे रामदास महानवर यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अनेकदा परिसरातील दिवे बंद असतात. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्रशांत रणवरे यांनी सांगितले. रेल्वे धक्क्यावर ट्रक आल्याने मोठ्या प्रमाणात माती, धूळ उडते. त्यामुळे काही माथाडी कामगारांना श्वसनाचे विकार जडले आहेत, तसेच क्रेन व कंटेनरचालकांनाही तोच त्रास होत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त निवारा शेड असून, लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
मालधक्क्यावर धुळीचे साम्राज्य आहेच. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने क्रेन आणि कंटेनर पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
>रेल्वेधक्का परिसरात काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाला पाठविण्यात आला आहे. निवारा शेडही त्याच विभागाच्या अखत्यारीत आहेत. आमचाही पाठपुरावा सुरू आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची टाकी त्वरित साफ करण्यात येईल.
- संजय गुप्ता,
मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे
>रेल्वेने जो निवारा बांधून दिला आहे, त्याचा स्टील मार्केटमधील कामगारांना फायदा होतो. रेल्वे धक्क्यावरील टोळीकरिता त्याचा काहीच फायदा नाही. तसेच धुळीच्या त्रासामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहोत.
- राजेंद्र बनकर,
भाजपा माथाडी कामगार ज्येष्ठ नेते