सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर कुपोषण आटोक्यात येऊ शकते
By admin | Published: May 2, 2017 02:59 AM2017-05-02T02:59:38+5:302017-05-02T02:59:38+5:30
वाढत्या कुपोषणाला पायबंद घालण्यासाठी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर कुपोषण निर्मूलन सूचना, उपाय व नियोजन
कर्जत : तालुक्यातील वाढत्या कुपोषणाला पायबंद घालण्यासाठी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर कुपोषण निर्मूलन सूचना, उपाय व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. अंगणवाडीसह घरातील पोषण सवयी बदलणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे, बालविवाह थांबणे आदी सूचना गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि पालकांनी मांडल्या. या सूचनांच्या आधारे पुढील काळातील नियोजन आणि इतर शासकीय विभागामध्ये समन्वय करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
येथील शनिमंदिराच्या रवि किरण सभागृहामध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजेनेअंतर्गत तालुक्यातील ४७ गावे निवडली आहेत. या गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेवा सुधारण्यासोबतच कुपोषित मुलांना त्यांच्या घरी देण्यात येणाऱ्या पोषणाच्या सवयी बदलणे, बालविवाह थांबवणे, मुलांमधील जन्माचे अंतर वाढविणे, स्थलांतर थांबवणे, यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे, आरोग्याची काळजी घेणे, आरोग्यसेवा मिळणे, आदी सूचना या सभेत मांडण्यात आल्या.
तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे यांनी किशोर वयापासून मुल सहा महिन्यांचे होईपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने लोकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी शैलेश डिखळे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक जंगले यांनी केले. या सभेला निवासी नायब तहसीलदार एल. के. खटके, तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयपाल गहाणे, खांडस प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबुराव वळवी, कळंब प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल लाडे आदींच्या उपस्थित समन्वय सभा घेण्यात आली. (वार्ताहर)