अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली
By सूर्यकांत वाघमारे | Published: June 22, 2023 04:55 PM2023-06-22T16:55:33+5:302023-06-22T16:55:41+5:30
आक्षेपार्ह्य व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबियांना धमकावून ५० हजाराची मागणी करणाऱ्याला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १३ वर्षीय मुलीसोबत स्नॅपचॅटवर ओळख वाढवून तिचे आक्षेपार्ह्य फोटो मिळवले होते. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पैशाची मागणी करत होता. यासाठी तो नाशिकवरून पनवेलला येऊन गेला होता.
पनवेल परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर मुलीची स्नॅपचॅटवर सिराज अहमद आबीद अली चौधरी (१९) याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर त्याने मुलीचा विश्वास संपादित करून तिचे आक्षेपार्ह्य फोटो, व्हिडीओ मिळवले होते. त्यानंतर तो तिला या फोटोच्या आधारे धमकावत होता. यासाठी तो पनवेलला येऊन तिला भेटून देखील गेला. यावेळी देखील त्याने तिच्यासोबत फोटो काढले होते. त्यानंतर त्याने सदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कुटुंबीयांकडे ५० हजाराची मागणी केली होती. यामुळे भयभीत झालेल्या पालकांनी पनवेल तालुका पोलिसांकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगदीश शेलकर, सहायक निरीक्षक निलेश फुले, अविनाश पाळदे, अंबिकर अंधारे यांचे पथक केले होते. त्यांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सिराजची माहिती मिळवून नाशिक गाठले. त्याठिकाणावरून सिराज याला अटक करण्यात आली असून तो गॅरेज कामगार आहे. त्याच्यावर बालकांच्या लैंगिक शोषणासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशाच प्रकारे त्याने इतरही कोणत्या मुलींना ब्लॅकमेल केले आहे का याचा तपास सुरु असल्याचे निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर त्याचा योग्य वापर होतोय का यावर पालकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.