बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 3, 2023 12:44 PM2023-03-03T12:44:59+5:302023-03-03T12:45:20+5:30
मुंबई गोवा मार्गावर खारपाडा येथे एकजण बिबट्याची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
नवी मुंबई - बिबट्याची कातडी घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीची अर्धवट सुकलेली कातडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा मार्गावर खारपाडा येथे एकजण बिबट्याची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, हवालदार अनिल पाटील, सचिन पवार आदींचे पथक केले होते. त्यांनी २८ फेब्रुवारीला रात्री खारपाडा टोलनाक्यालगत सापळा रचला होता. त्यामध्ये एकजण पाठीवर बॅग घेऊन येत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडले. यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये त्याच्याकडील बॅगेत बिबट्याची कातडी आढळून आली.
ही कातडी अर्धवट सुकलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वीच बिबट्याची हत्या करून ती कातडी काढली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार सदर व्यक्तीला अटक केली असून जितेंद्र उर्फ संजू पवार असे त्याचे नाव आहे. तो मंडणगडचा राहणारा असून त्याच्यावर नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली कातडी सुमारे अडीच लाख रुपये किमतीची असून ती कोणाला विकली जाणार होती ? त्याने ती कुठून आणली याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.