नवी मुंबई : पुन्हा एकदा कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईत एका कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला जवळपास २० किमी पर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. सुदैवाने यात ट्रॅफिक पोलिसाला कोणती दुखापत झाली नाही. याप्रकरणी आरोपी कार चालक आदित्य बेमडे याला अटक करण्यात आली आहे. आदित्य बेमडे हा नेरुळमधील रहिवाशी आहे.
आरोपी आदित्य बेमडे सिग्नल तोडून जात असताना ट्रॅफिक पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने गाडी थांबवली नाही. तेव्हा ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळले. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे.
ब्ल्यू डायमंड जंक्शन येथे रेड सिग्नल तोडून आणि स्कूटरला धडक देऊन जाणाऱ्या कार चालकाला ट्रॅफिक पोलीस सिद्धेश्वर माळी यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक आदित्य बेमडेने वेग वाढवला. यावेळी ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळले. त्यानंतर पुढे गेल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या पथकाने कारचा पाठलाग करून गव्हाणजवळ कारसमोर टँकर उभे केले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आदित्य बेमडे नशेत गाडी चालवत होता.