गोमांस पुरवणाऱ्या एकाला अटक
By admin | Published: July 23, 2015 03:44 AM2015-07-23T03:44:59+5:302015-07-23T03:44:59+5:30
गोमांस विक्री प्रकरणातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अद्यापपर्यंत चौघांना अटक केली होती
नवी मुंबई : गोमांस विक्री प्रकरणातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अद्यापपर्यंत चौघांना अटक केली होती. पाचवा साथीदार फैजान मजीद फरार होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत.
गोमांस विक्रीप्रकरणी मे महिन्यात इरफान पटेल, रिझवान पटेल, मोहम्मद शेख व फरिज कडके यांच्यावर कारवाई झाली होती. इरफान व रिझवान हे दोघे भाऊ मटण विक्रीच्या परवान्याखाली गाई व बैलाच्या मांसाची विक्री करायचे. परंतु दोन वर्षांपूर्वीच त्यांचा परवाना संपला होता. तरीही त्यांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांनी न्यायालयीन कोठडीची शिक्षाही पूर्ण केली आहे. फैजानवर गोमांस विक्री करताना पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप अहे. तो कल्याणमध्ये बैलबाजार येथे राहतो. वरिष्ठ निरीक्षक अशोक नाईक यांनी ही माहिती दिली. मंगळवारी तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)