मनपाने जपल्या आबांच्या स्मृती
By admin | Published: November 9, 2015 02:50 AM2015-11-09T02:50:32+5:302015-11-09T02:50:32+5:30
महापालिकेला मोरबे धरण विकत घेण्यास व इतर विकासकामांसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती पालिकेने जपल्या आहेत
नवी मुंबई : महापालिकेला मोरबे धरण विकत घेण्यास व इतर विकासकामांसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती पालिकेने जपल्या आहेत. नेरूळमध्ये १२ हजार चौरस मीटर भूखंडावर उभारण्यात आलेल्या भव्य उद्यानास त्यांचे नाव देण्यात आले असून शनिवारी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतल्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. हे धरण विकत घेण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांनी सहकार्य केले होते. नवी मुंबई परिसरातील डान्स बार बंदीही तेच गृहमंत्री असताना झाली. शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते झाले होते. त्यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्या यासाठी महापालिकेने त्यांच्या नावाने भव्य उद्यान उभारावे यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक रवींद्र इथापे व त्यापूर्वी सुरेखा इथापे यांनी पाठपुरावा केला होता. पालिकेने सेक्टर १९ मधील १२ हजार चौरस मीटर भूखंडावर उद्यान विकसित केले असून त्याला स्वर्गीय आर. आर. पाटील स्मृती उद्यान असे नाव दिले आहे.
या उद्यानात ८०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, योगा पार्क, मुलांसाठी खेळणी, याशिवाय ५ मीटर त्रिज्येचे सौर घड्याळ बसविण्यात आले आहे. उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, अविनाश लाड, संजीव नाईक, नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, सागर नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.