नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतदारसंघातील सध्याच्या घडामोडीबाबत चर्चा केली.नवी मुंबईतील विधानसभेच्या ऐरोली व बेलापूर यापैकी एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी शिवसैनिकांची मागणी होती; परंतु दोन्ही जागा भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसांपासून शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मंदा म्हात्रे यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. नाराज शिवसैनिकांची समजूत काढण्याची विनंती केल्याचे समजते. आमचे शिवसैनिक युतीचा धर्म पाळतील. प्रचारात संपूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.दरम्यान, गुरुवारी सकाळी मंदा म्हात्रे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेनेसह इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मंदा म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:48 AM