मंदा म्हात्रे यांची सिडको, पालिकेशी संयुक्त चर्चा; विकास आराखडा तातडीने तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:16 AM2020-11-30T00:16:35+5:302020-11-30T00:16:52+5:30
नवी मुंबईचे रखडलेले प्रश्न; विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याच्या सूचना मंदा म्हात्रे यांनी संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या.
नवी मुंबई : रखडलेला नवी मुंबईचा विकास आराखडा, संक्रमण शिबिरे व शहरातील विकासकांचे प्रलंबित प्रश्न आदी विविध प्रश्नांवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर संयुक्त चर्चा केली.
विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याच्या सूचना मंदा म्हात्रे यांनी संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या. त्यानुसार एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंदा म्हात्रे यांनी शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी चार एफएसआय देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. त्याअनुषंगाने विकासकांना भेडसावणाऱ्या संभव्य प्रश्नांचा आढावा म्हात्रे यांनी घेतला. आणीबाणीच्या काळात आवश्यक असलेली संक्रमण शिबिरे निर्माण करण्याबाबत दोन्ही प्राधिकरणांनी पुढाकार घ्यावा, नवी मुंबईचा विकास आराखडा तातडीने तयार केला जावा आदी महत्त्वपूर्ण प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. या वेळी भाजप जिल्हा महामंत्री विजय घाटे, भाजप उपाध्यक्ष पाशाभाई, विकासक भूपेश बाबू, नलीन शर्मा, देवांग त्रिवेदी उपस्थित होते.