पनवेल : कितीही यशाच्या उंच शिखरावर पोहोचलात तरी आपल्या मातीशी प्रामाणिक राहा. शेतकरीपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खारघर येथे केले. खारघर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड यांनी आयोजित केलेल्या शेतकरीपुत्र मेळाव्यात ते बोलत होते. खारघरमध्ये २० दिवस आंबा महोत्सव आणि शेतकरी बाजार सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. खारघर सेक्टर १२ येथील गोखले स्कूलच्या मैदानात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, बिना गोगरी, गीता चौधरी, विनोद ठाकूर, दिलीप जाधव, बिमान बोस, अमर उपाध्याय, प्रा. प्रीती ठोकले यांच्यासह पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.खोत म्हणाले, तीन वर्षांपूर्वी या शहरात शेतकऱ्यांचा नेता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून शेतकरी पुत्रांकडून माझा सन्मान होत आहे. हा सन्मान माझा घरचा सन्मान असून तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो. शेतकऱ्यांचा आणि जवानांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे ते या वेळी म्हणाले. मरणासन्न अवस्थेत असताना माझ्या वडिलांनी मला संदेश दिला की माझी काळजी न करता शेतकऱ्यांची काळजी घे, तोच संदेश आईनेही दिलाय, म्हणूनच बळीराजाची शपथ घेऊन, ‘जय जवान जय किसान’चा नारा मंत्रिपदाची शपथ घेताना दिला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी फळप्रक्रिया केंद्रांना अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. भातप्रक्रिया केंद्रांना प्रोत्साहन, शेतकरी बाजार आणि आंबा महोत्सव यावर भर देण्याचा संकल्पही त्यांनी सांगितला. (प्रतिनिधी)
खारघरमध्ये आंबा महोत्सव भरवणार
By admin | Published: April 01, 2017 11:52 PM