नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी मलावी देशातील आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी २३० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये १,२०० ते १,५०० रुपये किलो दराने हा आंबा विकला जात असून, १५ डिसेंबरपर्यंत याचा हंगाम सुरू राहणार आहे.
दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. यावर्षी गुरुवारी २३० बॉक्स मुंबई बाजार समितीमध्ये आले आहेत. तीन किलो वजनाचा एक बॉक्स असून, त्यामध्ये ९ ते १२ आंबे बसतात.
यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यामुळे मलावी आंबा ग्राहकांना जादा दराने विकत घ्यावा लागणार आहे. पहिल्या दिवशी होलसेल मार्केटमध्ये १२०० ते १५०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. मुंबईमध्ये १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून पुढील एक महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.
४०० एकरवर आंबा उत्पादन
मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण आहे. तेथील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये हापूस आंब्याची रोपे नेली होती. तेथे ४०० एकरमध्ये आंबा लागवड करण्यात आली आहे. एक एकरमध्ये ४०० रोपे लावण्यात आली आहेत. नोव्हेंबरमध्ये तेथील आंबा तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणच्या हापूसची चव असल्यामुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.