नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई बाजारसमितीच्या फळ मार्केटमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. आंबा पिकविण्याची पद्धत पुन्हा वादग्रस्त ठरली आहे. इथ्रेलचा वापर करायचा की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला असून रोज विक्रीसाठी येणारे २०० टन (किमान ४ लाख डझन) आंबे पिकवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला असून, या वादामध्ये शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये आंब्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. देशात सर्वाधिक उलाढाल होणाºया मुंबई बाजारसमितीमध्ये ३५० ते ४०० वाहनांमध्ये रोज ९० हजार ते एक लाख पेट्यांची आवक होत आहे. सरासरी २०० टन आंबा विक्रीसाठी येत असून, संपूर्ण मार्केट आंबामय झाले आहे. हंगाम व्यवस्थित सुरू असताना अचानक एफडीएच्या अधिकाºयांनी टाकलेल्या धाडीमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. एका शासकीय अधिकाºयाने आंबा पिकविण्यासाठी इथ्रेलचा वापर केला जात असून तो आरोग्यास घातक असल्याचा मॅसेज व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व आंबा खाणे आरोग्यास घातक असून, आंबा खरेदी करू नका, असा अपप्रचारही सुरू झाला. अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ एपीएमसीमध्ये धाडी टाकून इथ्रेलच्या बाटल्याही जप्त केल्या. या धाडीनंतर संबंधित प्रशासनाने अद्याप पिकविण्यासाठी वापरलेले रसायन घातक असून ते पिकविल्यामुळे आरोग्य बिघडत आहे का? याचा कोणताही अहवाल दिलेला नाही; परंतु धाडसत्रामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा आंबा २५० ते ८०० रुपयांना विकला जात होता. शनिवारी हा दर १५० ते ६०० रुपये झाला आहे. दोन क्रमांकाचा आंबा १५० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात होता. त्याची किंमत १०० ते ३०० रुपये झाली आहे. मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल रोज १५० ते २०० टन आंब्यांची आवक होत असून, रोजच्या रोज त्याची विक्री होत आहे. येथूनच मोठ्या प्रमाणात आंब्यांची निर्यात होत असते. पूर्वी आंबा पिकविण्यासाठी कैल्शियम कार्बाइडचा वापर केला जात होता. ही पद्धत घातक असल्यामुळे ती बंद करण्यात आली असून, त्याऐवजी इथ्रेलचा वापर केला जात आहे. इथ्रेल हे आंबा व इतर फळ पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे लिक्विड असून, ते मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. त्याच्या वापरावर आतापर्यंत कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नसल्यामुळे त्याचा वापर सुरू आहे. शासनाने याविषयी ठोस निर्णय घ्यावा. नक्की आंबा कसा पिकवायचा? कोणत्या औषधांचा वापर करायचा व कोणत्या नाही? हे स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.आंबा पिकविण्यासाठी अनेक ठिकाणी इथ्रेलचा वापर होत आहे. इथ्रेल हे अधिकृतपणे कृषीविषयक विक्रीच्या दुकानांमध्ये उपलब्ध असते. त्याच्या वापरामुळे आंबा व इतर फळांना रंग प्राप्त होतो. त्याचा वापर कसा व किती करायचा? याची मात्राही ठरली आहे. त्याच्या विक्रीवर अद्याप देशात कुठेच बंदी घातलेली नाही. कंपनीला व्यापाºयांनी टाकलेल्या मेललाही वापर करण्यास परवानगी असल्याचे उत्तर दिले आहे. अचानक एफडीएने धाडी टाकल्यामुळे इथ्रेलचा वापर करायचा की नाही? ते खरोखर घातक आहे का? याविषयी शासनाने व एफडीएने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
आंबा उत्पादक पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:40 AM