नवी मुंबई : अक्षयतृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यातून ५३ हजार पेट्यांची आवक झाली असून बाजारभावही नियंत्रणात आले आहेत.
आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्व असते. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होती व अक्षय तृतीयेला आवकचा विक्रम होत असतो. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी १ लाख १३ हजार व बुधवारी १ लाख १ हजार पेटी आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७३०३ पेटी हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. दक्षीणेतील राज्यांमधून ५३८४२ पेटी आंबा विक्रीसाठी आला आहे.
बाजार समितीमध्ये हापूस ३०० ते ५०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते १ हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. कर्नाटकमधील आंब्याला प्रतीकिलो १०० ते ११० रुपये भाव मिळत आहे. कोकणच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आला असल्यामुळे आता इतर राज्यातील आंब्याची आवक वाढू लागली आहे. मे अखेरीस गुजरातचा आंबा येणारहापूसची आवक यापुढे कमी होईल. मे अखेरीस गुजरातचा आंबा दाखल होईल. जुनच्या पहिल्या टप्यात जुन्नरचा आंबाही मार्केटमध्ये विक्रिसाठी येईल. यानंतर उत्तरप्रदेश व इतर ठिकाणचा आंबाही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
अक्षयतृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षीणेकडील राज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात आहेत. मे अखेरीस गुजरात व जुनमध्ये जुन्नरच्या हापूसची आवक होईल. - बाळासाहेब बेंडे, व्यापारी प्रतिनिधी