दासगाव : कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे, कमी प्रमाणात लागणे तसेच हवामानामध्ये वेळोवेळी बदल होत कोरडे ढगाळ वातावरण तयार होणे या कारणामुळे ही सर्व पिके धोक्यात येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लागली होती. परंतु या पावसाचा कडधान्य पिकावर काही परिणाम झाला नसून उलट चांगले पीक मिळाले. नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे मे महिन्यात मिळणारे आंबा पीक सध्या दोन दिवस पडलेल्या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. कोकणात आंबा पीक घेणारे जवळपास ४० टक्के शेतकरी आहेत. यांचा व्यवसाय एकच आंबा पीक. वर्षभर झाडांची मशागत करायची व मे महिन्यात येणारा आंबा चांगल्या पध्दतीने काढून बाजारात विक्री करून पैसा मिळून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र फेब्रुवारीमध्ये महाड तालुक्यात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी आंबा मोहोर येण्यास सुरुवात असल्याने यावर काही परिणाम झाला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत मे महिन्यात विक्रीसाठी मिळणारा आंबा आता जवळपास तीस ते चाळीस टक्के तयार होणार असताना अचानक ढगाळ व कोरडे वातावरण झाल्यामुळे या तयार झालेल्या आंब्याला गळती लागली असल्यामुळे मिळणारे पीक कमी प्रमाणात मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात अवेळी आंबा दिसत असला तरी तो औषधांची फवारणी करून पिकवण्यात येतो. मात्र मे, जून महिन्यातील येणारा आंबा या नैसर्गिकरीत्या पिकलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड पडण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या हवामानाच्या बदलामुळे गेले दोन दिवसांत महाड तालुक्यातील बहुतेक ठिकाणी आंब्याला गळती सुरू झाली आहे. या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी या पिकांसाठी व वर्षभराच्या मशागतीसाठी कर्ज घेऊन ही कामे करतात. मात्र या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या समोर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न पडला आहे, तरी आंबा पिकाच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून करण्यात यावे व याची भरपाई मिळावी, अशी मागणी गरीब शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
ढगाळ वातावरणामुळे आंबा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2016 2:08 AM