आमसभेतून आमजनता बेपत्ता !
By admin | Published: July 12, 2016 02:45 AM2016-07-12T02:45:32+5:302016-07-12T02:45:32+5:30
महाडची आमसभा सोमवारी महाड पंचायत समितीने आयोजित केली होती. गेली पाच वर्षे ही आमसभा फक्त साधकबाधक चर्चेनेच पार पडत होती.
दासगाव : महाडची आमसभा सोमवारी महाड पंचायत समितीने आयोजित केली होती. गेली पाच वर्षे ही आमसभा फक्त साधकबाधक चर्चेनेच पार पडत होती. यावर्षी देखील आमसभा जुलै महिन्यात घेतल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतल्याने अर्धेअधिक सभागृह रिकामे होते. शिवाय गेली पाच वर्षे तेच तेच प्रश्न उद्भवत असल्याने आणि सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याने सोमवारी झालेल्या आमसभेतून आमजनता बेपत्ता झाल्याचे चित्र दिसत होते. उशिरा सुरू झालेली आमसभा संध्याकाळी चार वाजेपर्यंत केवळ एसटी महामंडळ आणि वीज मंडळ या दोनच विभागांच्या प्रश्नांवरच अडकली होती.
ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा. लोकप्रतिनिधींसमोर अधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तरे द्यावीत, यासाठी आमसभा सुरू करण्यात आली. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली या आमसभेचे आयोजन करण्यात येते. येथील जनता ग्रामीण आणि शेतीप्रधान असल्याने ही आमसभा शेतीकामाच्या वेळी नसावी, अशी अपेक्षा असते. मात्र गेली पाच-सहा वर्षे महाडची आमसभा पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या लावणीच्या वेळेतच घेतली जात आहे. यामुळे ग्रामीण भागात नाराजी आहे. यावर्षीची आमसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. निमंत्रण पत्रिकेत सकाळी ११ वाजताची वेळ टाकण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात दुपारी सव्वाबारा वाजता ही आमसभा सुरू झाली. त्यातच सुरुवातीचे स्वागत गीत, पदाधिकाऱ्यांचे स्वागत, दुखवटा ठराव, अभिनंदनाचे ठराव यामध्ये जवळपास तास गेला आणि बरोबर सव्वा वाजता प्रत्यक्ष इतिवृत्त वाचनास सुरुवात झाली.
आमसभा एक तास उशिरा सुरू झाल्यानंतर ग्रामीण जनतेशी निगडीत असलेल्या समस्या पाहता पंचायत समितीच्या कामकाजावर चर्चा होणे अपेक्षित आहे, मात्र पंचायत समितीचे कामकाज दूर ठेवून अध्यक्षांनी अन्य शासकीय विभागांच्या कामावर चर्चा सुरू केली. सुरुवात एसटी विभागाने झाली. (वार्ताहर)