मलावी देशातील आंबा मुंबईत दाखल; प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर
By नामदेव मोरे | Published: November 28, 2024 02:19 AM2024-11-28T02:19:33+5:302024-11-28T02:20:46+5:30
प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. मुंबईसह दिल्ली व गुजरातमध्ये हा आंबा रवाना करण्यात आला आहे...
नवी मुंबई : सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. मुंबईसह दिल्ली व गुजरातमध्ये हा आंबा रवाना करण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दक्षीण पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा भारतामध्ये विक्रीसाठी येत असतो. ऐन हिवाळ्यात ग्राहकांना आंब्याची चव चाखता येते. यावर्षी एक आठवडा उशीरा आंब्याची आवक सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकीन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एक बॉक्समध्ये आंब्याच्या आकाराप्रमाणे १० ते २० नग आहेत. तीन किलो वजनाच्या या पेटीला ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला आहे. बाजार समितीमधून मुंबई क्रॉफर्ड मार्केट फळ बाजार, ब्रीचकँडी, घाटकोपर, माटुंगा, जूहू, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट व इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलावी चा आंबा मार्केटमध्ये येतो. यावर्षी एक आठवडा उशीरा आवक सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.
संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजार समिती
कोकणातून १३ वर्षापुर्वी नेली रोपे
कोकणातील हवामानाप्रमाणे मलावी देशातील हवामान आहे. भौगोलीक वातावरणातही साधर्म्य आहे. यामुळे मलावीमधील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून हापूसची रोपे नेली होती. तेथे जवळ पास ४०० एकर मध्ये हापूसची बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आंबा विक्रीसाठी भारतामध्ये येत असून त्यासोबत तेथील टॉकी अटकिन्स आंबाही विक्रीसाठी येतो.
कोणातील हंगाम उशीरा
गतवर्षी जानेवारीपासून कोकणच्या हापूसची नियमीत हावक सुरू झाली होती. परंतु यावर्षी कोकणचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये नियमीत समाधानकारक आवक सुरू होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.