नामदेव मोरे, नवी मुंबई : यावर्षी फळांच्या राजाचा मार्केटमध्ये मुक्काम सात महिने राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जुन्नरच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आला असून उत्तरप्रदेशमधून देशरीची आवक सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात लंगडा व चौसाचीही आवक होणार असून ऑगस्टपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होणार आहे.
यावर्षी फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच मुंबई बाजार समितीमध्ये हापूसची आवक सुरू झाली होती. गुढी पाडव्याच्या अगोदरच प्रतिदिन एक लाख पेटी आवकचा टप्पा पूर्ण झाला होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड मधील हापूसबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळमधील आंब्याची आवक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू होती. सद्यस्थितीमध्ये जुन्नर, आंबेगाच्या हापूस आंब्याची व उत्तरप्रदेशमधील दशेरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुरूवारी जवळपास ६३९ टन आंब्याची आवक झाली होती. सोमवारपर्यंत जुन्नरचा हंगाम संपेल व पुढील एक आठवडा देशेरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
जून अखेरीस व जुलैच्या सुरुवातीपासून उत्तरप्रदेशमधून लंगडा व चौसा आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहकांना ऑगस्टपर्यंत आंबा उपलब्ध होणार आहे. जुन्नर, आंबेगावच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आहे. देशेरीची आवक सुरू असून त्यानंतर लंगडा व चौसा आंबा उपलब्ध होईल. ऑगस्टपर्यंत मार्केटमध्ये आंबा ग्राहकांना मिळणार आहे.संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट आंब्याचे दरप्रकार- एपीएमसी - किरकोळजुन्नर हापूस (डझन) - २०० ते ५०० - ५०० ते १ हजारदशेरी(किलो) - ३० ते ४० - ८० ते १००