नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ८० किलोमीटरच्या मार्गात एकूण २३०.१८ हेक्टर जमीन सीआरझेडमध्ये मोडत आहे. यापैकी ५९.२३ हेक्टर जमिनीवरील खारफुटी बाधित होणार आहे. यामुळे खारफुटीची नक्की किती झाडे बाधित होणार, अशी विचारणा सागर किनारा नियंत्रण प्राधिकरणाने रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे केली आहे.
चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग या संस्थेने तयार केलेल्या नकाशाचा आधार घेऊन एमएसआरडीसीने सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी मागितली होती. त्यात विरार-अलिबाग मल्टिमाॅडल कॉरिडोरच्या नवघर ते चिरनेर या ८० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात एकूण २३०.१८ हेक्टर जमीन सीआरझेडमध्ये मोडत असून, पैकी ५९.२३ हेक्टर जमिनीवर खारफुटी असल्याचे म्हटले आहे. याचाच आधार घेऊन सीआरझेड प्राधिकरणाने एकूण किती झाडे बाधित होणार आहेत, मँग्रोव्ह सेलची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली आहे. मात्र, त्याचे उत्तर एमएसआरडीसीचे अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन तातडीने मँग्रोव्ह सेलचा रिपोर्ट सादर करावा, तो आल्यावर तत्काळ परवानगी देण्यात येईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या मार्गासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगीही अखेर रस्ते विकास मंडळाने मागितली आहे.
असा असेल कॉरिडोर८० किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून, शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे. हा कॉरिडॉर मुंबई - अहमदाबाद महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील.
या महानगरांना होणार फायदाहा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचा मोठा लाभ होणार असून, येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
अनेक महामार्ग एकमेकांना जोडले जाणारविरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळाला तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मुंबई - वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गाची भूसंपादन प्रक्रिया वेगात असून, त्याचा समृद्धीच्या विकासावर परिणाम होणार आहे. विरार - अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा दोन टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. यात पहिला टप्पा हा विरारनजीकच्या नवघर ते उरणनजीकच्या बलावली आणि दुसऱ्या टप्प्यात बलावली ते अलिबाग असा विकसित करण्यात येणार असून, तो समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई - अहमदाबाद, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई - गोवा - पुणे यांना जोडणारा एनएच - ४ बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.