चार वर्षे एकही दिवस मनीषने शाळा बुडवली नाही
By admin | Published: April 21, 2017 12:13 AM2017-04-21T00:13:48+5:302017-04-21T00:13:48+5:30
कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेणारा मनीष भोईर हा विद्यार्थी सन २०१३
नेरळ / कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेणारा मनीष भोईर हा विद्यार्थी सन २०१३ ते आजपर्यंत शाळेत एकही दिवस गैरहजर राहिला नाही. सलग चार वर्षे शाळेत उपस्थित राहून एक वेगळाच विक्र म केल्याने शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थांनी या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक करून त्याचा सत्कार केला.
बुधवारी सकाळी ११ वाजता भालिवडी गारु माता मंदिराच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मात भालिवडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैजनाथ येथे झालेल्या केंद्रीय इंग्रजी आणि गणित स्पर्धा २०१६-१७ मध्ये संपूर्ण केंद्रातून इयत्ता २ री मधील श्लोक पाटील (इंग्रजी), वेदिका सोमणे (गणित) विषयात प्रथम आले. तर इयत्ता ३ री मध्ये तन्वी हजारे इंग्रजीत तर अभिषेक पाटील गणितामध्ये प्रथम, ४थी मध्ये दीक्षा भोईर इंग्रजी तर मनीष भोईर गणितात प्रथम त्याचप्रमाणे मनीष भोईर याने उलटी उजळणी स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा, कोष्टके पाठांतर स्पर्धा, विविध शालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सहारा कोळंबे, कर्जत पंचायत समितीचे सभापती अमर मिसाळ, पंचायत समिती सदस्या भीमाबाई पवार, केंद्रप्रमुख नारायण सोनावले, भालिवडी सरपंच अलका वाव्हळ , संतोष कोळंबे आदी मान्यवरांसह वैजनाथ केंद्रातील शिक्षक यासाठी उपस्थित होते. (वार्ताहर)