Manoj Jarange Patil: राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होऊन त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं.
मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगेसोयऱ्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच जातप्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका..तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टीकला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.