मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी
By नामदेव मोरे | Published: January 26, 2024 01:26 PM2024-01-26T13:26:40+5:302024-01-26T13:27:12+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले.
नवी मुंबई : वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा साऊंड सिस्टीम पुरेशी नसल्यामुळे एक तास थांबविण्यात आली आहे. शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेली चर्चा व शासनाने दिलेली लिखीत पत्रावर दोन वाजता चर्चा करण्यात येणार आहे. आरक्षण घेतल्यानंतरच परत जायचे असल्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. हे पत्र घेवून ते वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेच्या ठिकाणी आले. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते भाषण सुरू करत असताना नागरिकांना व्यवस्थित आवाज येत नव्हता. यामुळे सभा थांबविण्यात आली आहे. नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुपारी दोन वाजता नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा पुन्हा सुरू केली जाणार आहे. शासनाने लिशखीत स्वरूपात जे दिले ते सर्वांना वाचून दाखविले जाईल. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाचा नवीन अद्यादेश नक्की काय आहे याविषयी सर्वांना उत्सूकता लागून राहिली आहे.
बैठक संपल्यानंतर तिरंगा हातात
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून बाहेर येताना हातामध्ये तिरंगा हातात घेतला होता. यामुळे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असण्याची शक्यता उपस्थितांमध्ये सुरू होती.
मनोज जरांगेंच्या हातात गदा
वाशी येथील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी गदा फिरवून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता नवीन जीआर विषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
आंदोलकांना पाणी द्या
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेसाठी सकाळपासून नागरिक थांबले आहेत. साडेबारा वाजता सुरू झालेली सभा साऊंड सिस्टीमअभावी थांबविण्यात आली. दरम्यान सर्व आंदोलकांना तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. तत्काळ टँकरद्वारे व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण सुरू करण्यात आले.