नवी मुंबई : अनेक मराठा आंदोलकांना पुण्याहून मुंबईकडे येण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गाबाबत माहिती नसल्याने बीड, जालना, छ. संभाजीनगर, धाराशीव येथून आलेल्या आंदोलकांची वाहने सायन-पनवेल मार्गाने एपीएमसी मार्केटकडे कुच करीत होती यामुळे या मार्गावर नऊ वाजल्यापासूनच कोंडी होण्यास सुरुवात झाली होती.
रायगड व नवी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे ऐवजी जुन्या मुंबंई पुणे हायवेंने लोणावळा येथून येण्यास परवानगी दिली. हा बदल मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केला. पुढे ही वाहने पनवेल नजिकच्या जंक्शन जवळ जेएनपीटी कडे जाणाऱ्या रस्त्याने वळवून पुढे पाम बीच मार्गे एपीएमसी मार्केटकडे वळविली होती. परंतु अनेक आंदोलकांना ही माहिती नसल्याने त्यांनी गुरूवारी संध्याकाळी सायन- पनवेल महामार्गाने आणली. यामुळे वाहनांनी येणाऱ्या आंदोलकांची गर्दी झाली होती. ढोल ताशे वाजत गाजत येणाऱ्या आंदोलकांमुळे नेरूळ पासून सानपाडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.