पनवेल : ब्रेकिंगच्या ब्रेकिंगच्या मोहापायी चुकीची बातमी देण्याची घाई करू नका, चुकीच्या बातमीचा परिणाम संबंधित व्यक्तीवर काय होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी रविवारी व्यक्त केले. पनवेल प्रेस क्लबच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत सानप हे बोलत होते.
या व्याख्यानमालेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मनोज सानप यांनी माहिती व प्रसारण प्रसिद्धी माध्यमे व सामाजिक जबाबदारी या विषयावर आपले मत मांडले. यावेळी सानप यांनी सर्व जण वापर करीत असलेल्या मोबाइलला दुधारी शस्त्राची संज्ञा दिली. यशस्वी होण्यासाठी स्पर्धा केलीच पाहिजे. मात्र, प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे सानप म्हणाले. ‘
लोकमत’ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी ‘डिजिटल पत्रकारिता संधी व माध्यमांसमोरील आव्हाने’ याविषयी आपले मत मांडले. यावेळी विनायक पात्रुडकर यांनी वाचकांना दैनंदिन जीवनाशी निगडित बातम्या वाचण्यात रस असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बातम्या देणे गरजेचे आहे. तरुण पिढी पेपर वाचत नसली, तरी त्यांच्या बातम्यांचे सोर्स बेबसाइट्स, सोशल मीडिया असल्याने नावीन्यपूर्ण पत्रकारिता काळाची गरज असल्याचे पात्रुडकर यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी आयोजित या व्याख्यानाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित लेखन स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राजेंद्र कोलकर, संघाचे अध्यक्ष संतोष घरत आदींसह पत्रकार उपस्थित होते.