मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन

By नारायण जाधव | Published: February 14, 2024 11:19 AM2024-02-14T11:19:12+5:302024-02-14T11:19:41+5:30

समाजातील डॅाक्टर झाले भावूक

Manojdada Jarange-Patil call off fast...; Appeal of Maharashtra Maratha Medics Association | मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन

मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे यासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत अतिशय खालावल्याने राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे. यात चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आपणा शिवाय आम्हास कुणी वाली नाही, आरक्षणाची लढाई सुरूच राहिल, आपण औषधोपचार घ्यावेत असे आवाहन मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्यने पत्राद्वारे  केले आहे. 

काय म्हटले आहे पत्रात

मनोज दादा आम्ही महाराष्ट्रातील सर्व मराठा डाॅक्टर सर्वात पहिले अशी ग्वाही देतो की आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्या विषयी समाजाच्या मनात कसली ही शंका नाही.आपण केलेल्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या पदरात खूप काही गोष्टी पडल्या आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व समाज कधी नव्हे तो आपल्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.

आपण प्रत्येक वेळी सांगत होता की आता तब्येत साथ देत नाही ,तरी ही आपण उपोषण करण्याचा निर्णय घेतला , समाज म्हणून आम्ही त्यावेळी ही सोबत होतो व आता ही आहे. पण आता आपली तब्येत अतिशय खालावली आहे व कोणत्याही क्षणी काही ही होऊ शकते म्हणून आम्ही आपणास मराठा मेडीकोज , महाराष्ट्र राज्य विनंती करतो की आपण हे उपोषण त्वरीत स्थगित करावे व उपचार घ्यावेत.

सरकार सोबतची लढाई सुरुच राहील पण आपणास काही झालं तर समाजाला कोणीच वाली उरणार नाही व समाजाचे प्रचंड मोठं नुकसान होईल. व आपण प्रत्येक वेळी म्हणता की सर्व निर्णय समाजाला विचारुन घेता मग आता समाजाचा ही एक निर्णय आपण ऐकला पाहिजे व उपोषण त्वरीत स्थगित केले पाहिजे.

घातली शिवरायांची शपथ

आपणास छत्रपती शिवरायांची शपथ आहे आपण हे उपोषण त्वरीत स्थगीत करावे व उपचार घ्यावेत. आपण हा लढा जिंकेपर्यंत असाच सुरू ठेवू  पण तुर्तास थोडं थांबू,कारण आपण समाजाला हवे आहात. जर आपणच राहिला नाहीत तर पुढं लढायला कोणच नसेल,परत दलालांचे फावेल व समाजाच्या नावावर दुकानादारी सुरू होईल. परत एकदा कळकळीची विनंती आपण उपोषण त्वरीत स्थगित करावे,व उपचार घ्यावेत.

Web Title: Manojdada Jarange-Patil call off fast...; Appeal of Maharashtra Maratha Medics Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.