बंधाऱ्याला मुहूर्त सापडेना !
By admin | Published: February 6, 2016 02:23 AM2016-02-06T02:23:32+5:302016-02-06T02:23:32+5:30
तालुक्यातील थेरोंडा येथे सुमारे ३६ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या ग्रोयान्स बंधाऱ्याच्या बांधकामाला कंत्राटदाराला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही
अलिबाग : तालुक्यातील थेरोंडा येथे सुमारे ३६ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या ग्रोयान्स बंधाऱ्याच्या बांधकामाला कंत्राटदाराला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिक मच्छीमार हवालदिल झाले आहेत. कंत्राटदाराने कामाला लवकरच सुरुवात करावी यासाठी स्थानिकांनी मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री, पालकमंत्री आणि मत्स्य आयुक्तांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. कंत्राटदाराने वेळेवर काम पूर्ण केले नाहीतर, त्याला दंड आकारण्यात यावा आणि प्रत्येक मच्छीमार बोटीमागे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील थेरोंड्यांच्या खाडी मुखाशी ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सरकारने ४२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. ७ जानेवारी २०१६ रोजी आर.बी. चव्हाण या कंत्राटदाराला हे काम मंजूर झाले. ३६ कोटी ८७ लाख ७० हजार ४२८ रुपये असा दर चव्हाण यांनी दिला होता. ग्रोयान्स बंधारा झाल्यामुळे स्थानिकांना आपापल्या होड्या चिखलात रुतवून मच्छी उतरावी लागणार नाही, होड्या सुरक्षित राहतील, त्याचप्रमाणे किनारपट्टीचे संरक्षण होणार आहे. तसेच ओहोटीच्या वेळीही खाडीमध्ये होड्या येऊ शकणार आहेत. त्यामुळे मच्छीमार चांगलेच खूश झाले होते. टेंडर मंजूर झाल्यावर लगेचच ठेकेदाराने जागेची पाहणी केली. त्याचप्रमाणे विविध आवश्यकती यंत्रसामग्रीही तेथे आणून ठेवण्यात आली होती.
बंधाऱ्याचे काम वेगाने व्हावे यासाठी स्थानिक मच्छीमारांनी त्यांची मच्छी सुकविण्याची जागा कंत्राटदाराला वापरण्यास दिली होती. समुद्रकिनारी वाहनांची ये-जा करण्यासाठी स्थानिकांनी रस्ताही करुन दिला होता. परंतु त्यानंतर तेथे ठेकेदार फिरकलाच नाही. कामाला कधी सुरुवात होणार याची वाट स्थानिक सातत्याने बघत आहेत. (प्रतिनिधी)तीन महिन्यांनी पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधणीचे काम युध्दपातळीवर होणे गरजेचे आहे. परंतु काम सुरु होत नसल्याने स्थानिक चिंतातूर झाले आहेत. थेरोंडा मच्छीमार विविध कार्यकारी सोयायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काम सुरु करण्यासाठी थेट मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.