नामदेव मोरे
नवी मुंबई : उद्योगांचे हृदय म्हणून बॉयलरची ओळख आहे. बहुतांश प्रमुख उद्योगांमध्ये याचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात ४५०० बाॅयलरचा वापर सुरू असून, आता निर्मितीमध्येही राज्याने आघाडी घेतली आहे. मागील वर्षभरात तब्बल १४०४ बॉयलरची निर्मिती करण्यात आली असून, त्यामधील १०७ निर्यात करण्यात आले आहेत.
बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या बाष्पके विभागाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जगातील सर्वात मोठे बॉयलर इंडिया २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १६ सप्टेंबरला झालेल्या प्रदर्शनामध्ये २८० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तीन दिवसामध्ये ३६ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल असे मानले जात आहे. देशात १५२ वर्षापासून बॉयलरचा उपयोग सुरू आहे. कारखान्यांमध्ये बॉयलरचा वापर केला जातो. सुरुवातीला बॉयलरचे स्फोट होण्याचे प्रमाण जास्त होते. हे अपघात कमी करण्यासाठी शासनाने वेळोवेळी कायदे करून व त्रुटी कमी करून अपघात कमी करण्यावर लक्ष दिले आहे. महाराष्ट्र सरकारने कामगार विभागाच्या अखत्यारीत बाष्पके विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यापासून सुरक्षेसाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात २००३-०४ या आर्थिक वर्षात ५५७ बॉयलरची निर्मिती केली होती.
३० मार्गदर्शक झाली शिबिरेबॉयलर उद्योगामधील नवीन तंत्रज्ञान त्याचा सुरक्षित वापर याविषयी माहिती सर्वांना व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे बॉयलर प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये बॉयलरचे मॉडेल पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय ३० मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले होते, अशी माहिती बाष्पकेचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली.
प्रदर्शनाचे फलितनवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या बाॅयलर प्रदर्शनामध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल ३६ हजार नागरिकांनी भेट दिली. ३० चर्चासत्रांमध्ये ५५ तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील २५०० मान्यवरांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. सहा देशांच्या वाणिज्यदूतांनी प्रदर्शनाला भेट दिली.
बॉयलर पार्कचे आश्वासनप्रदर्शनाच्या उद्घाटनाला १४ सप्टेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रात बॉयलर उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल व भविष्यात बॉयलर पार्क उभारण्यासही सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे.
१०० पेक्षा जास्त महाराष्ट्रात विविध प्रकारच्या बॉयलरची निर्मिती करणारे कारखाने
राज्यात बॉयलर अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. सद्यस्थितीमध्ये ०.०६ एवढे अपघाताचे प्रमाण आहे.