एकाच दगडात मारले अनेक पक्षी, गणेश नाईक यांची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:16 AM2019-04-01T05:16:51+5:302019-04-01T05:17:28+5:30
गणेश नाईक यांची खेळी : हुसेन यांचा मार्ग मोकळा, मेंडोन्सा, जैन चर्चेलाही पूर्णविराम
मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांचा मार्ग मोकळा करत, आनंद परांजपे यांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर टाकली आहे. दुसरीकडे, कट्टर विरोधक माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या परतीच्या चर्चेची वाट बंद करत, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन राष्ट्रवादीतून लढणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम देऊन नाईकांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नव्याने अस्तित्वात आलेला मीरा-भार्इंदर मतदारसंघ मिळावा, म्हणून हुसेन यांनी जोरदार प्रयत्न केले होते; पण मेंडोन्सा यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला खेचून भाजपाच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला; पण मोदीलाटेत मेंडोन्सांना पराभूत करून मेहता ९० हजार मते घेऊन आमदार झाले. काँग्रेसचे उमेदवार याकूब कुरेशी यांना २० हजार मतेसुद्धा मिळवता आली नव्हती. आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीआधी स्वत: मेंडोन्सांसह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये गेले. शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्वच उरले नाही. या अहंपणात पालिका निवडणुकीत काँगे्रसने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव झिडकारून टाकला. याशिवाय, राष्ट्रवादीचे उमेदवारही पळवले. दरम्यानच्या काळात भाजपाच्या माजी महापौर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत त्या मेहतांना पर्याय म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांचे कापले दोर
च्लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरामध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला सोबत घेण्यशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यातच गणेश नाईक कुटुंबीय व मेंडोन्सा यांच्यातील वाद नवीन नाही.
च्त्यामुळे मेंडोन्सा विधानसभेसाठी परत राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला दिल्याचे जाहीर करून टाकले. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्यांना पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
च्नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षात उमेदवारीसाठी येऊ इच्छिणाऱ्यांचे दोर कापून टाकत आपले राजकीय हिशेब चुकते केल्याचे सूत्रांनी सांगितले. हुसेन यांना आघाडीची धुरा सोपवतानाच लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची मोर्चेबांधणी चालवली असल्याचे यावरून स्पष्ट होते.