जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा; ३ अज्ञातांवर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 4, 2023 04:58 PM2023-07-04T16:58:24+5:302023-07-04T16:58:30+5:30
नियुक्तीचे ईमेल पाठवून पैशांची मागणी
नवी मुंबई : रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या पदावर नोकरी लागल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे. काहींनी पैसे दिले असून काहींनी रिलायन्समध्ये संपर्क साधल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रिलायन्स जिओच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रबाळे येथील रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने काहीजण इच्छुकांना संपर्क साधत आहेत. त्यामध्ये एखाद्याने नोकरीची इच्छुकता दाखवल्यास त्यांना नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र देखील पाठवले जात आहे. यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी पैशाची मागणी होत आहे. दरम्यान त्यांना ईमेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या पत्रात रिलायन्स जिओचा लोगो व ट्रेडमार्क यांचा देखील वापर केला जात आहे. त्याद्वारे आपल्याला जिओ मध्ये नोकरी लागल्याचे समजून काहींनी त्या व्यक्तींना पैसे देखील दिले आहेत. दरम्यान काहींनी जिओच्या अधिकृत ईमेलवर संपर्क साधून त्यांची नियुक्ती झाल्याबद्दलची खात्री केली असता जिओच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब आली आहे. त्यानुसार मागील काही महिन्यात रिलायन्स जीओकडे ४४ जणांनी ईमेलद्वारे फसवणुकीची तक्रार केली आहे.
त्यावरून जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे कंपनीच्या निदर्शनात आले आहे. याप्रकरणी जिओ इन्फोकॉमचे उप व्यवस्थापक सुधीर नायर यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.