चोरट्यांमुळे दीपावलीत अनेकांचं दिवाळं
By admin | Published: November 17, 2015 12:43 AM2015-11-17T00:43:38+5:302015-11-17T00:43:38+5:30
ऐन दीपावलीत चोरट्यांनी घरफोड्या करून अनेकांचं दिवाळं काढलं आहे. अवघ्या आठवड्यात दहाहून अधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये सात लाखांहून
नवी मुंबई : ऐन दीपावलीत चोरट्यांनी घरफोड्या करून अनेकांचं दिवाळं काढलं आहे. अवघ्या आठवड्यात दहाहून अधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये सात लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
दीपावली सणाला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व असल्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर सण साजरा करण्यासाठी अनेक जण नव्या दागिन्यांची तसेच इतरही वस्तूंची खरेदी करतात. शिवाय कामगारवर्गाला दीपावली साजरी करता यावी याकरिता कंपन्यांकडून बोनसही मिळत असतो. त्यामुळे दीपावलीत अनेकांच्या घरामध्ये दागदागिने तसेच मोठ्या प्रमाणात रक्कम जमा असते. असा लाखो रुपयांचा ऐवज घरातच ठेवून काही जण गावी देखील जातात. याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. त्यानुसार ऐन दीपावलीमध्ये चोरट्यांनी शहरात दहाहून अधिक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत.
सीबीडी, ऐरोली, खारघर, गोठीवली, तुर्भे तसेच इतर ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये सात लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घरफोडीच्या या बहुतांश घटना सर्वसामान्य नागरिकांच्या घरी घडलेल्या आहेत. त्यामुळे ऐन दीपावलीत त्यांचं दिवाळं निघालं आहे. गोठीवली येथे घडलेल्या घटनेत चोरट्याने दागिने चोरताना कपाटामधील बिलाच्या पावत्याही चोरून नेल्या आहेत. तर वाशीत घटलेल्या घटनेत चोरट्यांनी दुकानदारांना लक्ष्य केले होते. ग्राहकांनी दिवसा गजबजलेल्या दुकानांमध्ये व्यवहारातून मोठी रक्कम जमा असल्याचा अंदाज लावून चोरट्यांनी त्याठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. तर कळंबोली येथील सोनाराचेच अपहरण करून त्याला लुटण्याचा देखील अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केलेला आहे. यावरून नागरिकांकडून सणांचा आनंद लुटला जात असतानाच, चोरट्यांच्याही गुन्हेगारी हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)