टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती

By नारायण जाधव | Published: June 16, 2023 05:06 PM2023-06-16T17:06:42+5:302023-06-16T17:07:33+5:30

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून केली आहे.

Map of Navi Mumbai made from waste computer materials; Produced under the Three R | टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती

googlenewsNext


नवी मुंबई : पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर अशा 8 विभागांत सामावलेली आहे. अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून केली आहे.

यापूर्वी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागात लावण्यात आलेल्या संगणकीय टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या मदर इंडिया बोर्ड स्वरुपातील भारताच्या नकाशा ची विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय पातळीवर झालेली असून अशाच प्रकारचा नकाशा कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कमध्ये लावण्यात आलेला आहे. हे नकाशे संगणकातील अथवा लॅपटॉपमधील विविध टाकाऊ साहित्यापासून बनविण्यात आलेले आहेत.

याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा 5 फूट उंचीचा नादुरूस्त संगणक व लॅपटॉपधील मदरबोर्ड व इतर साहित्यापासून तयार केलेला नकाशा महापालिका मुख्यालयातील आयुक्त  दालनात प्रदर्शित करण्यात आला आहे.  23 निरुपयोगी लॅपटॉप, संगणकातील सर्कीट बोर्ड, कन्डेन्सर बॅटरी व वायर्स यांचा वापर करून बनविलेला हा नवी मुंबईचा नकाशा त्याच्या आगळ्या वेगळ्या स्वरुपामुळे पटकन लक्ष वेधून घेतो. 

     नवी मुंबईतील वेस्ट टू बेस्ट आर्टिस्ट  किशोर बिश्वास यांनी आपल्या सहका-यांसह मदर इंडिया बोर्ड नकाशासारखाच हा नवी मुंबईचा नकाशाही टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला असून त्यामुळे आयुक्त दालनाची शोभा वाढली आहे.
 
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री आर संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले जात असून कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अशा प्रकारे थ्री आर ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये रियुज अर्थात कच-याचा पुनर्वापर करणे या संकल्पनेनुसार संगणकीय निरुपयोगी साहित्यापासून नवी मुंबईचा नकाशा बनविण्यात आलेला असून आयुक्तांच्या भेटीसाठी येणा-या मान्यवर व नागरिकांमध्ये याव्दारे थ्री आर च्या संदेशाचे प्रसारण होत आहे.

Web Title: Map of Navi Mumbai made from waste computer materials; Produced under the Three R

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.