नवी मुंबई : मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचीत ठेवण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील गरीब समाजबांधवांचे नुकसान झाले. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनामध्ये कामगारांचा सहभाग असेल असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगारांच्या मेळाव्याचे आयाेजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून लढा उभारला होता. २२ मार्च १९८२ ला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधीमंडळावर मोर्चा काढला. सरकारने मागणीची दखल घेतली नसल्यामुळे दुसऱ्यादिवशी अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. वेळेत आरक्षण न दिल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब मराठा समाजाचे नुकसान झाले. मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक लढ्यात माथाडी कामगारांनी योगदान दिले आहे व पुढेही योगदान दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून माथाडी कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आता माथाडी कायदा अडचणीत आला आहे. कामगारांची पिळवणूक करणाऱ्या खंडणीखोर संघटना तयार झाल्या आहेत. कायदा व संघटना टिकविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही माथाडी कायदा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वांनी एकजुट होवून लढा द्यावा लागणार आहे. बाजार समितीचे अधिकार कमी केले जात आहेत. कायदा कमकुवत केला जात असून सर्वांनी एक होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यावेळी अण्णासाहेब पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुशा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, आनंद पाटील, रविकांत पाटील, भारतीताई पाटील, रमेश पाटील, पोपटराव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीतमाथाडी बोर्डातील अधिकारी अडवणुकीचे काम करत आहेत. पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसा फेको व तमाशा देखो अशी स्थिती सुरू असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. जे पैसे देणार त्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.