नवी मुंबई: आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या लाखो समाज बांधवांची नवी मुंबईकरांनी काळजी घेतली. एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. गैरसोय होऊ दिली नाही. नवी मुंबईकरांनी केलेल्या सेवेचे राज्यभर कौतुक होत असून तुमचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे कौतुगोद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले आहेत. नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आंदोलनासाठी सहकार्य करणारांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणासाठी आलेल्या लाखो मराठा समाजाचा नवी मुंबईत तळ पडला होता.
संपूर्ण नवी मुंबईकरांची सेवा केली. तीन दिवस एकही आंदोलकाला उपाशी राहू दिले नाही. मुंबई बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पाणी, जेवण, नाष्टा , वैद्यकीय सुविधा पुरविल्या. नवी मुंबईकरांनी खूप सेवा केली. याचे कौतुक सर्व राज्यभर होत आहे. या सेवाभावाचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलकांचा सरकारने धसका घेतला. सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या. आता काही विचारतात की आंदोलनातून काय भेटले. या आंदोलनाने राज्यातील संपूर्ण समाज एकवटला. राज्यात कुणबी नोंदीची संख्या ६२ लाखांवर पोहचली आहे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली. नोकर भरतीसह अनेक मागण्या मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, सचीव पी एल खंडागळे, अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वैभव नाईक, तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट, केमीस्ट असोसिएशन यांच्यासह मराठा आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद पोखरकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. अमरदीप गरड यांनी सुत्रसंचालन केले. मनोज जरांगे पाटील यांना शशिकांत शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांची पगडी देवून सन्मानीत करण्यात आले.
गाफील न राहण्याचे आवाहनआरक्षणाचा लढा शेवटच्या टप्यावर आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले की जवळपास २ कोटी मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाईल. आतापर्यंत साथ दिली आता गाफील राहू नका. मी जगेल तो समाजासाठी मरेल तो समाजासाठीच. गोर गरीब मराठा समाजाचा विश्वासघात करणार नाही. १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसत आहे. सर्वांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.