नवी मुंबईत मराठ्यांचा गर्दीचा विक्रम; दोन किलोमीटरचा रांगा
By नामदेव मोरे | Published: January 26, 2024 01:44 PM2024-01-26T13:44:19+5:302024-01-26T13:45:08+5:30
चौकाच्या चारही बाजूला भगवे वादळ : अंतर्गत रस्त्यांवर चक्काजाम
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आरक्षणासाठीच्या आंदोलनातील निर्यायक सभा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होत आहे. सभेला अभुतपुर्व गर्दी जमली आहे. सभेपासून तुर्भे रोडवर दोन किलोमीटरची रांग लागली होती. रेल्वे स्टेशन व कोपरखैरणे रोडवरही भगवे वादळ निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी नवी मुंबईचा आसमंत दुमदुमला होता.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे पहाटेपासून आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हजारो नागरिक बाजार समितीमध्ये शासनाच्या शिष्टमंडळाबरोबर काय चर्चा होणार हे ऐकण्यासाठी मार्केटमध्ये थांबले होते. शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना वाशीतील सभेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन केले. परंतु वाशी ते कोपरखैरणे रोडवर प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांना पायी जाणेही शक्य होत नव्हते. वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते वाशी प्लाझा, कोपरखैरणे रोड व अरेंजा सर्कलपर्यंत चारही बाजूला भगवे ध्वज हातात घेतलेल्या आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये प्रथमच एवढी मोठी सभा होत होती. या परिसरातील वाहतूक व्यवस्था इतर मार्गाने वळविण्यात आली होती. सभा दोन वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतरही सभेच्या ठिकाणी गर्दी हटत नव्हती. हजारो नागरिकांनी टेंम्पो, ट्रक, ट्रॅक्टरमध्ये राेडवर थांबूनच सभा ऐकण्याचा निर्णय घेतला होता.