मराठा क्रांती मोर्चाने केले वाशीत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:21 AM2018-07-20T03:21:29+5:302018-07-20T03:21:55+5:30
आरक्षणाचा आग्रह; शासनाची नोकरभरती थांबविण्याची मागणी
नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण लवकर जाहीर करावे व आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने प्रस्तावित नोकरभरती करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.
बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मोर्चाला पाठिंबा देत नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. राज्य शासनाने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात. आरक्षण लवकर जाहीर करावे, असा आग्रह धरण्यात आला. राज्य शासनाने ७४ हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत ही भरती करण्यात यावी. त्यामध्ये जेवढ्या जागा समाजाला येऊ शकतात त्या शिल्लक ठेवाव्या, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विनोद साबळे, अंकुश कदम, वीरेंद्र पवार, राहुल गावडे, सूरज बर्गे, पंकज घाग, मयूर धुमाळ, अमित ढोमसे, सुनीता देशमुख, राजश्री कदम, प्रशांत सोळसकर, मोहन पाडळे, अभिजीत भोसले, राजेश टेकले, हरीश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.