मराठा क्रांती मोर्चा : माथाडींची तिसरी पिढीही मैदानामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:21 AM2017-08-10T06:21:33+5:302017-08-10T06:21:44+5:30

मराठा आरक्षण हा माथाडी कामगारांसाठी जिव्हाळ्याचा विषय. १९८२ मध्ये आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी जीवनयात्रा संपविली. नेत्याचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार सदैव पाठपुरावा करत राहिले.

 Maratha Kranti Morcha: Third generation of Matthadi also in the field | मराठा क्रांती मोर्चा : माथाडींची तिसरी पिढीही मैदानामध्ये

मराठा क्रांती मोर्चा : माथाडींची तिसरी पिढीही मैदानामध्ये

googlenewsNext

नामदेव मोरे 
नवी मुंबई : मराठा आरक्षण हा माथाडी कामगारांसाठी जिव्हाळ्याचा विषय. १९८२ मध्ये आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी जीवनयात्रा संपविली. नेत्याचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार सदैव पाठपुरावा करत राहिले. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने कामगारांमध्ये अंगार पुन्हा जिवंत झाला. तिसरी पिढी आंदोलनामध्ये पाहावयास मिळाली. आता लढाईला पुन्हा सुरूवात झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला.
कोपरखैरणेमध्ये राहणारे सिद्धराम हेप्परगे हे निवृत्त माथाडी कामगार मराठा क्रांती मोर्चामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. ‘अमर रहे अमर रहे अण्णासाहेब पाटील अमर रहे’च्या घोषणा देताना त्यांच्या १९८२ च्या लढ्यातील प्रसंग आठवू लागले. ‘लोकमत’शी संवाद साधताना ते म्हणाले, १९८१ मध्ये अधिकृतपणे माथाडीचा नंबर मिळाला. माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यामध्ये यश मिळविल्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे काम हाती घेतले होते. राज्यभर जनजागृती सुरू होती. २२ मार्चला विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. लाखो कामगार उपस्थित राहिले होते. अण्णासाहेबांनी आरक्षणाचा निर्णय आजच्या आज जाहीर करा अशी आग्रही भूमिका घेतली. आरक्षण जाहीर झाले नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही अशी घोषणा केली. सरकारने निर्णय घेतला नाही व अण्णासाहेबांनी दिलेला शब्द पाळून स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपविली. कामगारांचा आधार हरपला व आरक्षणही मिळाले नाही. प्रत्येक कामगारामध्ये याची सल असल्यामुळेच निवृत्त झाल्यानंतरही आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत आलेले विरय्या स्वामी हेही १९७९ मध्ये माथाडी कामगार म्हणून रूजू झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.
अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर तब्बल ३५ वर्षे आरक्षणासाठीच्या आंदोलनाला गती मिळत नव्हती. मराठा महासंघाच्या माध्यमातून अ‍ॅड. शशिकांत पवार, विनायकराव मेटे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. परंतु आरक्षणासाठी अपेक्षित गती येत नव्हती. काँगे्रस - आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला, परंतु ते न्यायालयात टिकले नाही. आपल्या नेत्याने प्राणाची आहुती दिली पण आरक्षण मिळाले नाही ही खंत कामगारांना तीन दशके वाटत आहे. यामुळेच मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनापासून ते तो यशस्वी करण्यापर्यंत कामगारांनी स्वत:ला झोकून दिले होते. कामगारांची तिसरी पिढी मोर्चामध्ये सहभागी झाली होती. अण्णासाहेब पाटील यांचे नातूही मोर्चामध्ये सहभागी होते. आम्हाला नाही तर किमान आमच्या नातवाला तरी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.

वडिलांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत चळवळीमध्ये काम केले. मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. समाजाला आरक्षण मिळावे हे अण्णासाहेबांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी आम्हीही तन मन धनाने आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत.
- संतोष आहिरे,
कार्यकारिणी सदस्य,
माथाडी युनियन

मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू नये यासाठी आम्ही मोर्चात सहभागी झालो आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटावा व साहेबांचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच आमची इच्छा आहे.
- सिद्धराम हेप्परगे,
निवृत्त माथाडी कामगार

१९७९ मध्ये माथाडी कामगार म्हणून रुजू झालो. आम्हाला न्याय मिळवून देणाºया साहेबांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीच आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत.
- विरय्या स्वामी,
निवृत्त कामगार

Web Title:  Maratha Kranti Morcha: Third generation of Matthadi also in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.