नवी मुंबई : मागील सरकारच्या काळात मिळालेल्या आरक्षणाची बाजू महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात मांडली नाही. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबईच्या माध्यमातून बुधवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली.मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. मागील सरकारने मराठा समाजाचा मागास वर्ग आयोगातर्फे अहवाल मागवून समाजाला आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली असून, राज्य सरकारने मराठा समाजाची न्यायालयात बाजू मांडताना दुर्लक्ष केल्याचा आरोप समाजाच्या वतीने केला जात आहे. कोरोनाचे संकट असल्याने नवी मुंबईतील समन्वयकांनी नियमांचे पालन करीत, ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, राज्य समन्वयक अंकुश कदम, माजी नगरसेविका भारती पाटील, भारती मोरे, दत्ता घंगाळे, मयूर धुमाळ, विनोद पार्टे उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 1:28 AM