मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
By नामदेव मोरे | Published: October 19, 2023 06:34 PM2023-10-19T18:34:47+5:302023-10-19T18:34:58+5:30
आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होणार असले तरी सरकारला ते पेलवणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईत दिला.
मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईला भेट दिली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षण मिळेपर्यंत शांततेमध्ये आंदोलन केले जाणार आहे. पण शांततेमधील हे युद्ध सरकारला पेलवणार नाही. मागितलेल्या मुदतीमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढे आंदोलनाची दिशा काय असेल हे २२ तारखेला स्पष्ट करणार आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यभर दौरा करून मराठाबांधवांशी संवाद साधत आहे. राज्यात सर्वच मराठ्याचे बालेकिल्ले आहेत. दौऱ्यामधून शांततेमध्ये आंदोलनाचे आवाहन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने आमच्याकडून वेळ घेतला आहे. या वेळेत निर्णय घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा स्पष्ट करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल मोरे, मिलिंद सूर्यराव, राहुल गावडे, सागर पावगे, मयुर धुमाळ, सिद्धेश कांबळे, योगेश पवार, अमर सकपाळ, विजय धनावडे, विनोद साबळे, उमेश जुनघरे, विनोद पोखरकर, मंगेश मिस्किन, अभिजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.