मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी
By नामदेव मोरे | Published: February 11, 2024 06:22 PM2024-02-11T18:22:37+5:302024-02-11T18:22:52+5:30
सगेसोयरे व्याख्येत न बसणाऱ्यांनाही आरक्षण देण्याची मागणी
नवी मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा. कुणबी नोंदी सापडलेल्यांना तत्काळ दाखले मिळावे. सगेसोयऱ्याच्या व्याख्येत न बसणाऱ्यांनाही आरक्षण मिळावे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी. मराठा व ओबीसी वाद न वाढविताना हा प्रश्न सोडविण्याची मागणी राज्यातील मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये आरक्षणाशी संबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना त्याच स्वरूपाचा कायदा बनविण्यासाठी होत असलेले सर्वेक्षण हे पूर्णत: चुकिचे आहे. त्या सर्वेक्षणाविषयी समाजाकडून विविध आक्षेप नोंदविले जात आहेत. शासनाने याचा गांभीर्याचे विचार करावा.
नवीन सर्वेक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे की मराठा समाजाला मागास ठरविणाऱ्या गायकवाड आयोगाचा हलवाद रद्द करण्यासाठी आहे असा प्रश्न समाजाकडून उपस्थित केला जात आहे. दोनवेळा ५० टक्केवरील आरक्षण रद्दर झाले असताना सरकारने पुन्हा तसला प्रयत्न करू नये. मराठा समाजाचा कुणबी तत्सम जात म्हणून ओबीसीमध्ये समावेश व्हावा यासाठी माजी न्यायमुर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कार्यकक्षेत वाढ करून मराठा व कुणबी एकच आहेत व त्याआधारे त्यांचा ओबीसीत समावेश करावा. जुने गॅझेट्स, जिल्हावार जनगणनेचे रेकॉर्ड तपासावे अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
शासनाने विशेष अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मनेाज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा. कुणबी नोंद सापडलेल्यांना तत्काळ दाखले मिळावे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत व जे सगेसोयरे या व्याख्येत बसणार नाहीत त्या मराठा समाजाचाही ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी व मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची मागणीही बैठकीत केली. याशिवाय सारथी प्रशिक्षण संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, शिष्यवृत्ती व इतर प्रश्न सोडविण्याची मागणीही केली. या बैठकीला माजी आमदार नरेंद्र पाटील, किशोर चव्हाण, शरद जाधव, प्रशांत जाधव, दिपक पाटील, समाधान सुरवसे, ॲड संतोष शेजवळ, योगेश काटकर पाटील, अनंत जाधव, प्रशांत भोसले, नाना बच्छाव, गणेश सुर्वे, व्यंकट शिंदे, गणेश ढोबळे पाटील, उमेश शिर्के यांच्यासह मराठा महासंघ, छावा संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.