मराठा आंदोलक एपीएमसीसह मैदानांवर तळ ठोकणार, पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा
By नामदेव मोरे | Published: January 23, 2024 03:03 PM2024-01-23T15:03:18+5:302024-01-23T15:03:39+5:30
२६ जानेवारीला लाखो आंदोलक ध्वजाला सलामी देणार
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. एपीएमसी मार्केटसह मैदानांचा आधार घेतला जाणार आहे. महानगरपालिकेने फिरत्या शौचालयासह पाणी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा केली असली तरी अद्याप त्यांनी कोणतीही शासनाकडून ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत.
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. २५ जानेवारीला दुपारी आंदोलक पनवेलमध्ये येणार आहेत. सायंकाळी सर्वांचा मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या राहण्याची, जेवणाची व सर्व प्रकारची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले आहे. महानगरपालिकेची मैदाने, सिडको प्रदर्शन केंद्र व इतर ठिकाणीही सोय करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नियोजनासाठीची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महानगरपालिकेकडून फिरते शौचालय, पाणी व इतर सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडून बैठक झालेली नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
आंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. नवी मुंबई केमिस्ट असोसिएशननेही वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे. सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी बन्सी डोके, विनोद पोखरकर, डॉ. अमरदीप गरड, डॉ. बाळासाहेब जगताप, विजय खोपडे, सुनीता देशमुख, जयश्रीराजे महाडिक, सुजल बर्गे, गणेश ढोकळे पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणाला सर्वाधिक गर्दी
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे एपीएमसी परिसरामध्ये आंदोलक राष्ट्रध्वजाला सलामी देणार आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज यावेळी उपस्थित राहणार असल्यामुळे ध्वजारोहणाला विक्रमी गर्दी होण्याची शक्यताही मराठा समन्वयक समितीने व्यक्त केली.
अस्वच्छता झाली तर महापालिका जबाबदार
आंदोलकांसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडेही केली आहे. पण, या सुविधा मिळाल्या नाही व शहरात अस्वच्छता झाली तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असा इशाराही समन्वयकांनी दिला.