नवी मुंबई : तुर्भे येथे राहणाऱ्या माथाडी कामगार तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीवरून तो कर्जबाजारी होता, हे समोर आले आहे. त्याबरोबरच, सरकार मराठा आरक्षण देत नसल्याचीही नाराजी त्याने चिठ्ठीमध्ये व्यक्त केली.तुर्भे सेक्टर २० येथे राहणाºया अरुण भडाळे (२६) याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी तो सहकारी मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. शनिवारी सकाळी दरवाजासमोरील बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात, त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. ही चिठ्ठी कोपरखैरणेत राहणाºया त्याच्या आत्येभावाकडून पोलिसांना मिळाली आहे. शुक्रवारी रात्री तो मद्यपान करून भावाकडे गेला होता, परंतु परत तुर्भेला जाताना तो सोबतची बॅग घरीच विसरला होता. या बॅगमध्ये ती चिठ्ठी सापडल्याचे आत्येभावाने सांगितल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय निकम यांनी सांगितले.या चिठ्ठीवरून अरुण हा कर्जबाजारी असून, एका फायनान्स कंपनीनेही कर्ज देण्याकरिता रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, कर्जवसुलीसाठी तगादा लावणाºयांच्या नावांचाही उल्लेख चिठ्ठीत आहे, तसेच आपल्या आत्महत्येला त्याने सरकारलाही जबाबदार धरले आहे. दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत, परंतु सरकार आरक्षण देत नाही. परिणामी, मराठा तरुण नोकरी-व्यवसायात मागे पडत असल्याचीही खंत त्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार आरक्षण देणार नसल्याने आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख त्यामध्ये आहे. त्यानुसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात त्याच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे, तसेच आत्येभावाने पोलिसांकडे दिलेली चिठ्ठी अरुण यानेच लिहिली आहे का? हेसुद्धा तपासले जात असल्याचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता.
Maratha Reservation: कर्जबाजारी माथाडी तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 5:44 AM