नवी मुंबई - सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आजच काढा. ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात तर प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत हवंतर इथेच थांबतो. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सकाळी ११ पर्यंत काढा. तोपर्यंत आम्ही वाशीतच थांबू. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या १२ वाजता घेऊ अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ३७ लाख लोकांना आम्ही प्रमाणपत्रे वाटप केलेत असं सरकारने सांगितले आहे. ज्या लोकांच्या नोंदी झाल्यात त्यांचा डेटा आम्ही मागितला आहे. शिंदे समिती रद्द करू नये. या समितीची मुदत वर्षभर वाढवा अशी मागणी आपण केली. त्यावर टप्प्याटप्प्याने वाढवू असं सरकारने सांगितले. ज्याची नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावेत. त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. आपल्यासाठी अध्यादेश महत्त्वाचा आहे. ५४ लाख बांधवांच्या कुटुंबात आणि सगेसोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे असेल तर ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांनी शपथपत्रे द्यायची. त्या शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्रे दिली जाईल. शपथपत्र मोफत करावे अशी मागणी आम्ही सरकारला केली. ती सरकारने मान्य केली असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.
दरम्यान, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घ्यायचे अशी मागणी आपण केली. ते पत्र शासनाने आम्हाला द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायच्या नाहीत. जर शासकीय भरती करायच्या असल्या तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेऊन करायच्या अशी मागणी आपण केली. त्यावर राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देऊ असं सरकारने सांगितले पण मुलांचे काय?. सरकारने आजच्या रात्री हा अध्यादेश द्यावा. आम्ही वाटलं तर आजची रात्र इथेच काढतो. आज आझाद मैदानाकडे जात नाही. परंतु मुंबई सोडत नाही. अध्यादेशावर अभ्यास करतो. त्यात काही चुकीचे आहे का यावर रात्रभर अभ्यास करतो. जर आज अध्यादेश नाही दिला तर उद्या मी आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.