- नामदेव मोरेनवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन दिवसांत दहा लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. बाजार समितीमध्ये एका वेळी दोन लाख नागरिकांसाठी स्वयंपाक करता येण्याची सोय करण्यात आली होती. मराठा समाजाने प्रत्येक घरातून चार भाकरी, भाजी संकलित करून अन्नदात्याची भूमिका बजावली. यामध्ये बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगारांनी सिंहाचा वाटा उचलला होता. नवी मुंबईकरांनी आईच्या मायेने केलेल्या आदरातिथ्याने समाजबांधव भारावून गेले होते.
नवी मुंबई मराठ्यांच्या निर्णायक लढ्याची साक्षीदार ठरली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे निघालेल्या दिंडीचा मुक्काम २५ जानेवारीला नवी मुंबईत पडला होता. आंदोलकांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सकल मराठा समाज नवी मुंबईने घेतली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने राहण्यासाठी पाच मार्केट उपलब्ध करून दिली. बाजार समिती व वाशी ते तुर्भे परिसरातील सर्व रस्ते, मोकळ्या जागांवर मराठ्यांचा तळ पडला होता. बाजार समितीने शौचालय, पाणी, राहण्यासाठी जागा या सर्व सुविधा दिल्यानंतरही जेवण पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांनी अन्नदानाची जबाबदारी घेतली. प्रत्येक मार्केटमध्ये सामूहिक किचन तयार केले. एकाच वेळी दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांसाठी अन्न शिजवून त्याच्या वितरणाची यंत्रणा तयार केली. व्यापारी व कामगार स्वत: सर्व जबाबदारी पार पाडत होते. सकल मराठा समाजाने ‘चार भाकरी प्रेमाच्या’ संकल्पना राबविली. या माध्यमातून प्रत्येक घरातून भाजी, भाकरी, चटणी संकलित करण्यात आली. दोन दिवसांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त भाकरी संकलित झाल्या होत्या. याशिवाय पुलाव, भात आमटीचीही सोय केली होती.
विभागनिहाय अन्नदानबाजार समिती परिसरात दोन दिवसांत १० लाख नागरिक जेवल्याचा अंदाज आहे. नेरूळमध्ये चार ठिकाणी, सानपाडा व इतर ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती. अनेक आंदोलकांनी स्वत: स्वयंपाक करण्यासही प्राधान्य दिले होते.
परतीच्या प्रवासात शनिवारी नवी मुंबईपासून पनवेलपर्यंत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी समाजबांधवांनी चहा-बिस्किटे, नास्ता याची सोय केली होती.
मार्केटनिहाय जबाबदारीकांदा मार्केट : २५ हजार फळ मार्केट : २५ हजार भाजीपाला मार्केट : २५ हजार धान्य मार्केट : ६० हजार मसाला मार्केट : ५० हजार विस्तारित भाजी मार्केट : २० हजार