आरक्षणाचा लढा जिंकून वाजत-गाजत-नाचत मराठा समाज परतला
By नारायण जाधव | Published: January 28, 2024 07:40 AM2024-01-28T07:40:40+5:302024-01-28T07:41:31+5:30
Maratha Reservation: आठवडाभरापूर्वी समाजबांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेल्या जरांगे-पाटील यांनी कोणत्याही आमिषाला भीक न घालता आणि राजसत्तेचा दबाव येऊ न देता मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्याच ताेंडून आरक्षणाची अधिसूचना वदवून मराठा आरक्षणाचा अवघड किल्ला लढवून आपला लढा जिंकला आहे.
- नारायण जाधव
नवी मुुंबई - सहा महिन्यांपूर्वी त्यांना जालन्याच्या अंतरवाली सराटी गावाशिवाय कोणी ओळखत नव्हते. मात्र, तुमची मागणी नि:स्वार्थी आणि हेतू स्पष्ट असेल तर समाज तुमच्या मागे उभा राहतो. तुमचे दिसणे वा तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, हे मराठा आंदोलनाचे राज्यातील एकमेव नेते म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आठवडाभरापूर्वी समाजबांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेल्या जरांगे-पाटील यांनी कोणत्याही आमिषाला भीक न घालता आणि राजसत्तेचा दबाव येऊ न देता मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्याच ताेंडून आरक्षणाची अधिसूचना वदवून मराठा आरक्षणाचा अवघड किल्ला लढवून आपला लढा जिंकला आहे. यामुळे राज्यातील मराठा समाजाचे ते हिरो झाले. आरक्षणासाठी लक्ष लागून राहिलेल्या राज्यभरातील मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर त्यांनी आनंद फुलवला.
मनोज जरांगे-पाटील यांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आता माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. समाजासाठी मरण आलं तरी बेहत्तर’ असे सांगून आठवड्यापूर्वी जालन्यातून राजधानी मुंबईकडे कूच केले होते. या वाटेत त्यांना समाजबांधवांसह इतर समाजाचा, धर्मियांचा जो प्रतिसाद मिळत होता, तो पाहता या खेपेला मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील महायुती सरकारला काहीतरी करणे भाग पडेल, पण नक्की काय पदरात पडेल, हे कोणाला सांगता येत नव्हते. परंतु, एकमेव मनोज जरांगे सांगत होते, या खेपेला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेलच. ते त्यांनी खरे करून दाखवले. या लढ्यात त्यांनी सरकारकडून हाेणाऱ्या वाटाघाटींसाठी टिकणारे आरक्षण मिळावे, सरकारी कागदपत्रांत काही दगाफटका होऊ नये, यासाठी तज्ज्ञांची टीमही सोबत घेतली होती. सरकारकडून आलेली प्रत्येकी बोलणी, वाटाघाटींसाठी त्यांनी याच टीमचा सल्ला घेतला.
बाजार समितीत ४७ वर्षांत प्रथमच शेतकऱ्यांची छावणी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून ४७ वर्षांत प्रथमच मार्केटमध्ये लाखो शेतकऱ्यांची छावणी पडली. आंदोलनानिमित्त राज्यातील शेतकरी मार्केटमध्ये दाखल झाले.
मराठा आरक्षण आंदोलनात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या काेनाकोपऱ्यातील शेतकरी सहभागी झाला होता. सर्वांच्या राहण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये करण्यात आली होती. ७० हेक्टर जमिनीवर आंदोलकांचा तळ पडला होता. बाजार समिती ही शेतकऱ्यांचीच संस्था. यामुळे आपल्याच संस्थेमध्ये मुक्कामाला आल्याची भावना आंदोलकांनी बोलून दाखविली. १५ ऑगस्ट १९४७ ला मुंबई बाजार समितीची स्थापना झाली. सुरुवातीला मुंबईमध्ये व १९८१ नंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्केट नवी मुंबईत स्थलांतर झाली. संस्थेचे नाव कृषी उत्पन्न बाजार समिती असले तरी प्रत्यक्षात येथे स्वत: शेतकरी येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आतापर्यंत येथे माथाडी कामगारांचे व इतर मेळावे झाले पण शेतकऱ्यांचा भव्य मेळावा कधीच झाला नव्हता.
४७ वर्षांत प्रथमच बाजार समितीमध्ये एकाच वेळी लाखो शेतकरी एकत्र आले होते. मुंबई बाजार समितीने या सर्वांसाठी राहण्याची सोय, पाणी, शौचालय, जेवण व इतर सुविधा पुरविल्या. बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, अधिकारी कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी एवढे शेतकरी आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.