'उत्सव मराठी भाषेचा' सुलेखन प्रदर्शनातून नवी मुंबईत मराठी भाषेचा गौरव
By योगेश पिंगळे | Published: February 25, 2024 05:35 PM2024-02-25T17:35:56+5:302024-02-25T17:36:13+5:30
२४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वाशीत सुलेखन प्रदर्शन
नवी मुंबई : मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि मराठी भाषेची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, विशेषत्वाने नव्या पिढीला याचे महत्त्व कळावे व मराठी भाषेची गोडी वाढावी, यादृष्टीने सुलेखनाच्या आकर्षक माध्यमातून मराठी भाषेचा बहुमान केला जात असल्याचे सांगत सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत २४ तास विनामूल्य खुले राहणाऱ्या या सुलेखन प्रदर्शनाला मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन केले.
२७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने २४ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक चौक या भागामध्ये आयोजित 'उत्सव मराठी भाषेचा' या खुल्या सुलेखन प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, सुलेखनकार अच्युत पालव, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, कलावंत अशोक पालवे व श्रीहरी पवळे आणि सुलेखनकार कलावंत व मराठी भाषा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुलेखनकार अच्युत पालव हे नवी मुंबई शहराचे भूषण असून, शहर सुशोभीकरणाचे राजदूत असल्याचे उपायुक्त डॉ. राजळे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी पालव यांनी 'निश्चय केला, नंबर पहिला' हे महापालिकेचे ध्येयवाक्य सुलेखनातून मोठ्या कागदावर रेखाटत मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छाही सुलेखनातून दिल्या. या प्रदर्शनामध्ये श्रीकांत गवंडे, श्वेता राणे, अनिता डोंगरे, तेजस्विनी भावे, अमृता अमोदकर, तृप्ती माने फुरिया, हर्षदा साळगांवकर, यतीन करळकर, प्रसाद सुतार, मनीषा नायक, पूजा गायधनी, रूपाली ठोंबरे, निलेश गायधनी, रोहिणी निंबाळकर, रसिका कोरगावकर, वैशाली अधिकारी यांनी सुलेखनातून कविता व मराठी साहित्यकृतींतील वाचनीय उतारे आकर्षकरीतीने अक्षरालंकृत केलेले आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित 'उत्सव मराठी भाषेचा' हे खुले सुलेखन अक्षर प्रदर्शन वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २८ फेब्रुवारीपर्यंत २४ तास खुले असणार आहे. नागरिकांनी आपल्या मुलांसह याठिकाणी आवर्जून भेट देऊन मराठी भाषेची संपन्नता अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रसिकांना मिळणार कवी, लेखकांचा अक्षर साहित्याचा अनुभव
अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे प्रशिक्षणार्थी शशिकांत गवंडे व तृप्ती माने फुरिया यांनीही सुलेखनाद्वारे मराठी भाषेची महती आकर्षक अक्षरलेखनातून प्रकट केली. ज्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो अशा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता या प्रदर्शनामध्ये रसिकांना लक्षवेधी सुलेखनातून अनुभवयास मिळणार आहेत. यासह अनेक दिग्गज कवी, लेखकांचा अक्षर साहित्याचा अनुभव या ठिकाणी रसिकांना घेता येणार आहे.