इंग्रजी माध्यमासाठी अट्टाहास , मराठी माध्यमाच्या शाळेवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:58 AM2018-06-12T04:58:01+5:302018-06-12T04:58:01+5:30
मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या हालचालीविरोधात पालकांनी कोपरखैरणेतील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावेळी केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापनाने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा कोंडवाडा केल्याचाही संताप पालकांनी व्यक्त केला.
नवी मुंबई - मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या हालचालीविरोधात पालकांनी कोपरखैरणेतील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावेळी केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापनाने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा कोंडवाडा केल्याचाही संताप पालकांनी व्यक्त केला. मात्र यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार करून देखील अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याचाही आरोप त्यांनी केला.
कोपरखैरणे सेक्टर १ येथील तेरणा मराठी शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून शाळा व्यवस्थापनाकडून नव्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारून जाणीवपूर्वक पटसंख्या घसरवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा पालकांचा आरोप आहे. त्याकरिता संपूर्ण शाळेच्या इमारतीपैकी अवघे चार ते पाच वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले आहेत, तर उर्वरित संपूर्ण इमारत दुसऱ्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी वापरली जात आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शौचालयाची देखील गैरसोय झालेली आहे. त्यावरून शाळा व्यवस्थापनाकडून उघडपणे होत असलेला भाषा द्वेष मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसह पालकांना खटकू लागला आहे. यावरून मागील तीन वर्षे त्याठिकाणी शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये वाद सुरू आहेत. अशातच सोमवारी पुन्हा एकदा संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला.
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी तातडीने दाखले आवश्यक असतानाही ते देण्यात विलंब होत आहे, तर इतर वर्गातील विद्यार्थ्यांचे संगणक शुल्क भरलेले असतानाही ते पुन्हा भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे संतप्त पालकांनी माजी नगरसेवक सुरेश सालदार यांच्या नेतृत्वाखाली शाळेवर धडक दिली. यावेळी पालकांचा संताप अनावर होत असल्याचे पाहून मुख्याध्यापक मोहन शिंदे यांनी शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे रजिस्टर पालकांपुढे मांडले. त्यात ज्या विद्यार्थ्यांनी संगणक शुल्क भरल्याच्या नोंदी होत्या, त्यांना देखील पुन्हा शुल्क भरण्यासाठी शाळेने दबाव आणल्याचा पालकांनी आरोप
केला आहे.
तर सदर मराठी शाळा शासन नोंदीवर अनुदानित असतानाही, आजवर भरमसाठ शुल्क आकारण्यात आल्याचाही पालकांचा आरोप आहे. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची हेळसांड होत असतानाही, त्याची तक्रार करून देखील शिक्षण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण कट कारस्थानामध्ये काही अधिकाºयांसह कथित सामाजिक कार्यकर्त्यांचाही हात असल्याचा संशय पालकांकडून व्यक्त होत आहे.
सिडकोने तेरणा मराठी शाळेसाठी सदर ठिकाणची जागा दिलेली आहे. त्याठिकाणी मराठीच शाळा चालणे अपेक्षित असतानाही सदर इमारतीमध्ये खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा भरत आहे. त्या शाळेला संपूर्ण इमारत सुपूर्द करण्यासाठी व्यवस्थापनाकडून मराठी माध्यमाची शाळा बंद करण्याचा घाट रचण्यात आलेला आहे. त्यानुसार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक करून शाळा सोडण्यास भाग पाडले जात आहे.
- सुरेश सालदार, माजी नगरसेवक
सालाबादप्रमाणे यंदाचीही नव्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. पालकांच्या उर्वरित तक्रारी व्यवस्थापनापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत, तर कर्मचाºयांअभावी विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे.
- मोहन शिंदे, मुख्याध्यापक