रिक्षा बॅचसाठी मराठी तरुणांची अडवणूक
By admin | Published: January 7, 2016 01:01 AM2016-01-07T01:01:44+5:302016-01-07T01:01:44+5:30
परप्रांतीय नागरिकांना पुरेसे पुरावे नसताना रिक्षा चालविण्याचा बॅच तत्काळ मिळत असताना मराठी तरुणांना मात्र तीन ते चार महिने ताटकळावे लागत आहे
नवी मुंबई : परप्रांतीय नागरिकांना पुरेसे पुरावे नसताना रिक्षा चालविण्याचा बॅच तत्काळ मिळत असताना मराठी तरुणांना मात्र तीन ते चार महिने ताटकळावे लागत आहे. नेरूळ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरपासून एका तरुणाला चारित्र्य पडताळणीसाठी हेलपाटे मारावयास लावले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण प्रत्येक वर्षी रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये येतात. सुशिक्षित असूनही चांगली नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण रिक्षा चालवून किंवा वाहनचालकाची नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यामुळे रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या अनेकांना परमिट मिळण्याची आशा वाटू लागली आहे. अनेकांनी जूनपासून रिक्षा परमिटसाठी अर्ज केले आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सप्टेंबरमध्ये रिक्षा परवान्यासाठी अर्ज केला होता. आरटीओ विभागाने ३ सप्टेंबरला त्याच्या चारित्र्य पडताळणीसाठी त्याचा अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविला. आयुक्तालयातून नेरूळ पोलीस स्टेशनकडे वर्ग केला. नेरूळ पोलिसांनी अर्जदार दिलेल्या पत्त्यावर राहतो काय, त्याचे स्वत:चे घर आहे की भाडेतत्त्वावर, घर भाड्याने असल्यास त्याची नोंद पोलिसांकडे आहे का , त्याचे यापूर्वीचे वास्तव्याचे ठिकाण व मूळ गावचा पत्ता, त्याच्यावर काही गुन्हे आहेत का याची चौकशी करून तो अहवाल आरटीओकडे देणे आवश्यक होते.
नेरूळ पोलिसांकडे या तरुणाने पाठपुरावा करूनही त्याला अद्याप चारित्र्य पडताळणी अहवाल दिलेला नाही. त्याने पोलिसांना स्वत:च्या नावाचे वीज बिल, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका दिली आहे. परंतु यानंतरही पोलीस वारंवार अर्जातील त्रुटी काढू लागले आहेत. मालमत्ता कर भरल्याची पावती द्या, सोसायटीचा ना हरकत परवाना द्या या सर्व गोष्टी दिल्या नाहीत तर चारित्र्य पडताळणी अर्ज दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.